रविवार, २६ जुलै, २०१५

तेरा साथ है तो ….

तेरा साथ है तो ….

शामलचा फोन आला जेव्हा आवेश meeting मध्ये होतो आणि मोठ्या तावातावाने काहीतरी बोलत होता. पण शामलचा फोन बऱ्याच दिवसांनी आला त्यामुळे त्याला घ्यावा लागला.
"तुला भेटायचं होत . संध्याकाळी office सुटल्यावर येते !"
"अग माझी meeting चालू होती आणि मी माझ वाक्य सुद्धा अर्धवट सोडून आलो. सगळ्यांना वाटत कि बायकोला हा इतका घाबरतो आणि बघतो तर तुझा फोन " आवेश  जरा चिडून बोलला
"जावू दे रे ! मैत्रिणीचा फोन घेतला तर इतका काय चिडतो ? आणि तशी पण मी तुला जवळ पास ३-४ आठवड्यांनी फोन करतेय"
"काम काय आहे ते सांगा madam !"
"ते संध्याकाळी बोलू ना यार !!"
"आता फोन ठेव आणि हो ऑफिस मधल्या वेळेतच ये ग बाई !!"
"बर साहेब "

शामलची त्याला तशी बऱ्याच दिवसांनी भेटणार होती. आवेश आणि शामल एकाच college मधले. काही common मित्रांच्या ओळखीने त्यांची भेट झाली होती. अभ्यासाचे विषय वेगळे, college च्या वेळा वेगळ्या आणि दोघांमध्ये हुशार कोण याची परीक्षा नसल्यामुळे ते बऱ्याच गप्पा मारायचेत . डिग्रीचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर आवेश पुण्याला नोकरीसाठी आला. शामल काही महिन्यांनी नोकरी शोधण्यासाठी आली आणि पुन्हा भेटी होऊ लागल्या. काही वर्षात तीच लग्न झाल पण नशिबाने तिचा नवरा पुण्याचाच होता. त्यांच्या भेटींची frequency कमी झाली पण mail ने काही न काही तरी संवाद व्हायचा.

संध्याकाळी शामल आली तेव्हा ती दोघे जवळच्या एका coffee shop  मध्ये गेले . गप्पांचा फड रंगणार कि लग्न झालेली मैत्रीण तिच्या संसारातल्या अडचणी सांगणार कि सासू चे गाऱ्हाणे सांगणार ? पण इतक्या दिवसांनी भेटणार असल्यामुळे काही तरी serious  असणार असा विचार आवेश ने केला .

शामल आली आणि बोलत सुटली. तिच्या बोलण्याच्या छंदापायी कधी कधी वाटत कि शामल ला जर limited talktime मिळाला असेल बोलण्याचा तर हा तिचा तिसरा lifetime recharge असेल.

office  चे तीन चार विषय चघळून झाल्यावर तिला आवेश ने आठवण करून दिली कि काही तरी महत्वाच बोलाण्यासाठी ती आलीय.
" तुला आठवत का आपण लास्ट टाईम कुठल्या नाटकाला गेलो होतो? किंवा एखादा गाण्याचा program ??
सांगलीला असतांना किती enjoy  करायचो ना आपण . नाटक काय, गाण्याचेप्रोग्राम काय,  कवितांच्या मैफिली काय ? नुसती धम्माल. लग्नानंतर एकदा गेलो तर माझा नवरा तर आलाच नव्हता आणि तुझ्या बायकोने एका गाण्यामध्ये १०० रुपये याप्रमाणे तुझ्याकडून २३०० रुपयांची shopping करून घेतली .

हे अगदी खर होत त्यामुळे आवेश पण थोडा ओशाळल्या सारखा झाला. आवेशच्या बायकोला संगीताचा गंध नाही. मग तिने हा असा सौदा केला होता. पण आवेश ला या विषयावर बोलायचे नव्हते.
"बर हा विषय आहे का आपल्या भेटीचा?? "

"नाही रे !! कधी कधी वाटत किती सोप्प असत ना सगळ ?? माझ्या नवऱ्याला यातलं काहीच आवडत नाही म्हणून तो माझ्या सोबत कधीच येत नाही. मी एकटी हे enjoy करू शकत नाही म्हणून मला जायलाच मिळत नाही . साथीदार म्हणून त्याची साथ फक्त संकटात नाही तर आपल्याला जे मनापासून आवडत ते करण्यात पण मिळावी ना. माझी हि अपेक्षा नाही कि त्याने माझ्या level  ला येवून ते enjoy कराव पण कमीत कमी  सोबत असावं. मला कविता आवडतात म्हणून एक कवितांच छान पुस्तक द्यावं, गाण्याच्या program  चे तिकीट काढून छान रविवारचा बेत करावा पण नाही. "

आवेश मनातल्या मनात विचार करत होता  कि आज बहुदा नवरा या विषयावर मोठ्ठ पुराण लिहिल्या जाणार. पण शेवटी ती बोलणार तरी कुणाकडे . असले विषय नातेवाईकांमध्ये काढता येत नाहीत. उगाच बोभाटा होतो.  मैत्रिणी असल्या कथा kitty पार्टी मध्ये सौस ला लावून खातात त्यामुळे आवेशसारखा नुरुपद्रावी मित्र बरा नवऱ्याचे  गाऱ्हाणे सांगायला. पण आज शामल जास्त जोमाने बोलत होती. तिच्या मनावरचा घाव तर जास्त खोल होता अथवा संसारातल्या नेहमीच्या घडणीचा घाव असावा . एकाच ठिकाणी वर्षोन वर्षे टोचणारी सुई एवढे वार कधी कधी एकाद्या चाकूच्या जखमे समोर जास्त वाटतात.

आवेशने गंभीर व्हायचं ठरवलं आणि तीच बोलण ऐकू लागला.
"तुझ्या नवऱ्याला  माहित आहे तू इकडे आलीस ते ??"
"हो मग मी सांगून आलेय आणि कदाचित त्याला कल्पना पण असेन कि मी हेच बोलणार आहे!"
"अरे व्वा , म्हणजे आग already  लागलीय आम्ही फक्त बंब घेवून जायचं !! शामल , तुला जे हवाय ते रास्त आहे नवऱ्याने तुझ्या सोबत यायला हव अगदी नाटकाला सुद्धा. मला मान्य आहे अग पण त्याला ते enjoy पण करता अल पाहिजे ना. त्याच मन त्या सगळ्या मध्ये गुंतलं पाहिजे ना."
"अरे पण माझ्या साठी आला तर काय बिघडत ?"
"शामल विषय त्याच्या आवडीचा आहे आहे त्याच्या  वेळेचा नाही. आणि तुला आठवत असेल तो आला पण होता आपण दोघे एका कविता वाचनाच्या कार्यक्रमाला त्याला घेवून गेलो होतो. काहीही गंध नसतांना तो आला होता आणि त्याने पूर्ण वेळ तुला दिला होता
पण कार्यक्रम संपल्यानंतर तुला बोलला होता कि हा कदाचित शेवटचा प्रोग्राम असेल माझा. आणि घरी येतांना त्याने माझी खूप थट्टा  पण केली होती .

"शामल, साहित्य हा त्याच्या आवडीचा विषय नाहीय हे तुला काबुल कराव लागेल पण त्यानंतर आपण एक दोन कार्यक्रम attend केलेत तो आपल्यासोबत आला नाही पण त्याने तुला कधी अडवलं पण नाही. हो पण आता तुझा हा हट्ट असेल कि त्याने याव आणि सोबत बसून स्वतावर अत्याचार करून घावे तर मग हा अन्याय आहे ना. आणि त्याने तुला कधी थांबवले नाही ना !!"

शामल शांत झाली होती तरी पण तिच्या मनातले विचारांचे वादळ शांत झाले नव्हते.
आवेशने मी उगाच तिला चिडवण्यासाठी बोलत होतो, " काय मग आज काल  facebook ची profile  कुठली ??
आणि हो आज च्या आपल्या coffee चे update  नको हा टाकुस fb  वर. मला घरी explaination द्यावं लागत.
" काही पण ? मी तुझ्या बायको ला ओळखते. तिला सांग न मी आले होते भेटायला म्हणून. "
अग बाई अस काही करू नको. मी तिला सांगितलं नाहीय कि मी तुला भेटायला आलोय. "

खर तर आवेशाला स्पष्ट सांगितलं सांगायचं होत कि त्याच्या  बायकोला शामलशी तिच्याशी अथवा कोणताही मैत्रिणीला भेटायला आवडत नाही. आवेशने विचार केला कि एक चांगली comparison पण सापडली.

"शामल, कधी अभयने तुला अडवलं का ग माझ्या शी भेटायला ?? मला आठवत कि लग्न झाल्यावर पहिल्यांदा तुम्ही दोघे माझ्याकडे आले होते. अभयने भरपूर गप्पा मारल्या होत्या अगदी मनमोकळ्या. त्याला काहीच प्रोब्लेम नव्हता या गोष्टी चा कि मी तुझा मित्र आहे. त्याला आपण कितीतरी गोष्टी सांगितल्या - आपण बघितलेले pictures , नाटकं, गाण्याचे प्रोग्राम्स, shopping….  पण कुठेही अभयच्या चेहऱ्यावरून वाटल नाही कि त्याला या कशात काही वावग वाटत होत."

"--"
"अग कधीतरी हा पण विचार करून बघ कि जर अभयला हे सगळ पटल नसत मग तू काय केल असत ?? लग्ननंतर त्याने जर मित्रांशी बोलण, त्यांच्या contact मध्ये राहू  नकोस असले नियम केले असते तर तू काय केल असत. आणि direct त्याने नाही म्हटलं असत तर वेगळी गोष्ट पण मनातल्या मनात हे ठेवून तो फक्त तुला judge करत बसला असता तर तू काय केल असत. मी हे म्हणत नाहीय कि असा स्वभाव असणे हि चांगली गोष्ट आहे पण फक्त या कारणासाठी तुमचे releations बनायला वेळ लागला असता. अभय तसा नाहीय ही  खूप चांगली गोष्ट आहे . तू त्याला सांगून मला भेटायला येवू शकते, माझ्यासोबत नाटकाला जावू शकते या गोष्टी कडे बघ. तो तुझ्या सोबत नाटकाला  येत नाही हा प्रोब्लेम नाहीय."
"मी असा विचार कधी केला नाही "
"मला माझ्या बायकोला सांगता पण येत नाही कि  मी आत्ता तुझ्या सोबत आहे. तिला संशय येईल फक्त हि भीती नाहीय पण ती अस्वस्थ होते तिला सगळ सांगाव लागत मग तिला थोडं हायस वाटत. याला प्रेम पण म्हणता येईल किंवा मला मिळणाऱ्या स्पेस बद्दल दु :ख पण करता येईल. मुख्य प्रश्न तिच्या comfort चा आहे. "

एक प्रकारे आवेशच पण मन मोकळ झाल. शामल शांत झाली होती. अभय सोबत येत नाही पण आपले छंद जोपासायचे स्वातंत्र त्याने आपल्याला दिलाय याची जाणीव तीला पहिल्यांदा झाली. आणि या एका गोष्टीसाठी  अभय वाईट किंवा चुकीचा ठरत नाही. आवेश तर त्याला space  मिळत नसताना सुद्धा कधी complaint करतांना दिसत नाही. ती विचारात गढून गेली आणि वाफाळलेली coffee त्यांनी cold coffee म्हणून घेतली.

बऱ्याचदा आपण फक्त याचा विचार करतो कि आपला जोडीदार कसा नाहीय ? तो अजून काय करू शकतो ज्याने आपल्याला छान वाटेल पण जिकडे आपण compare करतो त्या प्रांतांत कमी पडणारा आपला जोडीदार एकाद्या वेगळ्या प्रांतात मोठ्ठी मजल मारतो. फक्त आपल्याला कळत नाही. विश्वास ठेवावा लागतो आणि वेळ पण द्यावा लागतो. थोडीशी possesive वाटणारी बायको पण  घरच्या जवाबदार्या आणि तिची नोकरी सांभाळते. आणि बरेच काहि. प्रश्न हा आहे कि बायकोवर अपेक्षांचं ओझ लादाव कि जे ओझ ती आधीच वाहतेय त्यात तिला मदत करावी ?? आपले छंद जोपासता येतात याचा आनंद मानावा कि त्यावेळी आपला जोडीदार सोबत असावा , मग अगदी त्याला ते आवडो अथवा न आवडो !! हट्ट कशाचा करावा हा प्रश्न आहे.

प्रश्न फक्त आवेश आणि शामलचा आहे का ???


अमित जहागीरदार
२६ जुलै २०१५
पुणे

( संपूर्ण काल्पनिक कथा )

शनिवार, १८ जुलै, २०१५

प्रपोज करण्याचे प्रकार -भाग ४ - फरक स्पष्ट करा

प्रपोज करण्याचे प्रकार -भाग ४ - फरक स्पष्ट करा

गोष्ट तशी बरीच  जुनी आहे. मी चिंचवडला आपल्या मित्रांसोबत राहायचो. मी, आशिष आणि प्रणव !! आमच्या flat वर नुस्ता धिंगाणा चालायचा. सोबत बाहेर भटकण असो वा picture बघण असो सगळ्यांची फक्त धमाल  असायची. एक वेगळी धुंदी असायची नुस्ती वयाची नाही तर या उमेदीची लहर पण असायची कि आता पुढली  आयुष्याची पायरी चढायची आहे. आणि पुढल्या पायरी नंतर सगळ सगळ आपल्या पायावरती लोळण घालेल अशी भाबडी आशा !! आता मागे वळून पाहिलं कि  वाटत सगळ खरच इतक सोप्प असत तर??आयुष्य म्हणजे बर्फावर घसरण्या सारख ! त्यात एक वेगळी नशा त्या वेगाची, पण शीतल वाटणारा हाच बर्फ भाजण्या इतकाच दाह देवू शकतो. पण तेही वय असतच ना  बागडायचं !!
आम्ही पण तसेच होतो, आपल्या आपल्या कामांमधून वेळ काढून धम्माल करायचो. flat  वर येणाच्या वेळा  जरी वेगवेगळ्या असल्या तरी मिळेल तो वेळ आम्ही मनसोक्त enjoy केलाय. मला गुरुवारी सुट्टी असायची आणि बाकीच्यांना रविवारी त्यामुळे flat वर दोनदा "सेलिब्रेशन" व्हायचं.

माझी आणि प्रणवची office  म्हधून येण्याची वेळ जरा सारखी असायची त्यामुळे कुठे फिरायला जाणे छोटे मोठे शोप्पिंग आम्ही सोबत करायचो. पण गोष्ट तेव्हा रंग बदलू लागली जेव्हा प्रणव थोडा उशिरा यायला लागला. office मध्ये जास्त वेळ बसून खुर्च्या "गरम" करणे यावर यथेच्छ टीका करणारा प्रणव यायला बराच उशीर करू लागला. मी त्याला एक दोन वेळा विचारले पण मला काही उत्तर मिळाले नाही. मोघम उत्तर देवून त्याने वेळ मारून नेली. मी पण जास्त पाठपुरावा केला नाही. पण office मधल काम वाढल असा निष्कर्ष माझ्या मनाला पटत नव्हता.

काही दिवसांनी  J M रोड वर फिरतांना संभाजी parkच्या प्रवेश दाराशी प्रणव मला दिसला. ऑफिसचे काही मित्र आणि "मैत्रिणीं" सोबत !! मी मुद्दाम जावून त्याला तिथे भेटायला गेलो. त्याने माझी ओळख करून दिली. सगळ्या मैत्रिणींमधून एका गोड हसणाऱ्या आणि उगाच थोड लाजणाऱ्या मुलीची ओळख त्याने मैत्रीण म्हणून करून दिली- गीतिका. मी त्याच्या कडे बघून थोडस हसलो पण त्याने चेहऱ्यावरचे भाव बदलू दिले नाहीत.बाकीच्या मित्र-मैत्रीणींनी मला अवांतर विषयावरती प्रश्न विचारले पण गीतिका शांत होती.
माझ्या सोबत माझ्या college  एक मित्र होता मी त्याला म्हटले सुद्धा कि प्रणवची गाडी रुळावर धावणार.
त्याला पटत नव्हत पण मी त्याला सांगितले कि माझ्या प्रदीर्घ अनुभवावर विश्वास ठेव. आम्ही पैज वगैरे लावण्याचा विचार नाही केला, पण थोडे दिवस थांबण्याचे ठरवले. सगळ्या मुलींची नुसती नावं  सांगितली आणि त्या एका मुलीची ओळख मैत्रीण म्हणून करून दिली हा संदेश माझ्यासाठी नव्हता तर तिच्यासाठी होता एवढ न कळायला मी काही कच्चा लिंबू तेव्हाही नव्हतो !!

रात्री flat  वर पोहोचलो पण मी प्रणव कडे हा विषय काढला नाही किंवा त्याला चिडवायचे म्हणून बाकींच्या partners ला देखील काही सांगितले नाही. पण त्याच्या वागण्यात बरेच अमुलाग्र बदल जाणवत होते. स्वतः साठी चार वस्तु घेण्याचा बेत करून shopping ला जाणारा आणि एकही वस्तु न घेता परत येणारा प्रणव मोठ मोठ्या bags घेवून घरी येवू लागला. आरश्या समोरचा वेळ वाढला, पर्फूमस्च्या बाटल्या वाढल्या, "बाकीच्या" बाटल्यांमधला रस कमी झाला. फोनवरची संभाषण वाढले आणि असले वार्तालाप बाहेर होवू लागले. प्रणव office मधे थांबला की किती काम असत याचे तपशील देऊ लागला, कुणी मागितले नसताना. मला माहीत असलेल्या गोष्टीचा बभ्रा न केल्यामुळे त्याला कोणी चिडवत पण नव्हत. पण अश्यावेळी मित्रांनी केलेली थट्टामस्करी छान वाटते. पण प्रणवला हे सगळं अनुभवता नाही आल माझ्या "मुसुद्दीपणाच्या" भुमिकेमुळे.

 आणि एके दिवशी flat आम्ही दोघेच असतांना त्याने मला एक प्रश्न विचारला.
" अम्या, आवडणे आणि प्रेम यामधला फरक काय??
मला संदर्भ कळला होता पण मी प्रश्नावर फोकस करायचे ठरवले.
" प्रणव, अगदी परीक्षे मधला प्रश्न वाटतोय. फरक स्पष्ट करा .
"सांगणार आहेस का ??"
" प्रयत्न करतो सांगण्याचा. एखादी व्यक्ती आवडते तर आपल्याला ती छान वाटते आपण तिच्या कडे बघत बसतो. म्हणजे उदाहरण द्यायचं असेल तर सिनेमा मधली heroine ! आपल्याला ती आवडते आपण तिचे pictures कित्येकदा बघतो पण ती एखाद्या हिरो सोबत नाचते, प्रेम करते याच आपल्याला दु:ख होत नाही.
पण प्रेम असाल कि आपल्याला वाटत कि आपल्या जवळ असावी आपल्या आयुष्यात असावी आणि आपण तिच्या !! मला तुला हाच फरक सांगता येईल. "
मी एवढ बोलून विषय संपवला, आणि तो पण झोपी गेला.

साधारण एखाद्या आठवड्यानंतर त्याने मला ती धक्कादायक बातमी सांगितली . ती गोड हसणारी मुलगी त्याच्या आयुष्याचा एक भाग होती . मनमुराद मिठी मारून त्याने मला धन्यवाद दिलेत.
मी अचंबित झालो आणि म्हटले, " अरे मला कसले thanks  म्हणतोय ?? मी तर तुम्हा दोघांना कधी भेटलो पण नाही. एकदाच तू माझी ओळख करून दिली… . "
" ती ओळख आणि मग तू सांगितलेला प्रेम - आवडणे हा फरक. त्यासाठी thanks . आधी मी खूप गोंधळलो होतो- मला ती आवडते कि माझ तिच्यावर प्रेम आहे. आणि या दोन्ही गोष्टींमधील सीमारेषा खूप पुसट असल्यामुळे मला काही  कळत नव्हते. मलाच माझं उत्तर सापडत नव्हत. एकदा आम्ही सगळे canteen मधे बसलो होतो. गप्पांच्या ओघात पुढल्या आयुष्याचे plans, लग्न , जोडीदार हे सगळे विषय निघालेत. त्यावर सगळे बोलत होते  आणि गीतिकाने तिच्या लग्नाचा विषय घरी निघतोय हे सांगितले आणि मी अस्वस्थ झालो. आवडणे आणि प्रेम यामधला तू सांगितलेला फरक मला जाणवला.  मी त्या संध्याकाळीच तिला propose केले. तीने मलाच विचारले की मी तुला आवडते की फक्त एक सवय झालीय माझ्या असण्याची. मी आवडणे- प्रेम मधला फरकाचा फंडा सांगितला. मला तू आवडतेस हे तुला पण माहित आहे पण तू माझी व्हावी असा विचार मनात येवू लागलाय. याला प्रेम म्हणतात अस मला वाटत.  तुला काय वाटत ?? तिने उत्तर दिल नाही फक्त घरी येण्याच आमंत्रण दिल."
" अरे वा म्हणजे आमची शिकवणी कामास पडली."
" मग . ती पण आयुष्यभरासाठी !!"

त्याने propose  कसे केले याचा किस्सा साधा होता पण  "फरक स्पष्ट करा" हा उसना घेतलेला फंडा वापरून केलेलं हे propose थोड वेगळ होत. प्रेम तर फुललेल होतच पण त्याचा बहर दोघांना दिसायचा बाकी होता. कधी कधी दोघांच्या  मनातल्या गोष्टी बाहेर यायला फक्त एक क्षण हवा असतो. त्या क्षणाला  कसे सजवायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. प्रेम असेल तर ते वाट शोधून बाहेर येणारच फक्त तो क्षण जपण्यासाठी त्याला काहीतरी नाट्यमय गोष्टींमध्ये गुंफून ठेवावं लागत. मग आयुष्य भर ते क्षण जपता येतात !!


शाळेतल्या प्रश्नपत्रिकेमधला नेहमीचा प्रश्न - फरक स्पष्ट करा असा कामास पडेल अस कधी वाटल नाही.

- अमित जहागीरदार
१८ जुलै २०१५
पुणे 

गुरुवार, २ जुलै, २०१५

पहिली मैत्री(ण)

पहिली मैत्री(ण)

आता हा blog  वाचल्यावर माझे सगळे मित्र माझ्यावर धावून येणार. म्हणजे आम्ही तुझ्यासाठी मैत्रीच्या व्याख्येमधे बसत नाही का? आणि फक्त मैत्रिणीवर तुला लिहिता येत !! पण खुलासा आधीच केलेला बरा. मित्रांनो, तुमच्याशी झालेली मैत्री ठरवून केली नाही. अगदी तुम्हाला पण कळल नाही कि आपण कधी मित्र झालो आणि तेही इतके जवळचे !!असो मूळ गोष्ट मैत्रिणीची आहे. त्यामुळे तिकडे वळू या. 

मला सगळे तपशील देता येतील याची शाश्वती नाही. हि गोष्ट माझ्या college च्या वेळेची. मुलींशी मैत्री हा माझ्यासाठी "तेव्हा" कठीण विषय होता. मला जमले पण नाही आणि मी वेळ घालवला पण नाही . असली मजल मित्रांनी पण कधी मारली नाही तेव्हा आमचा द्रुष्टी"कोन " एकच  होता.

शमा साहनी !! नाव आज पण लक्ख आठवत. तसं सगळच आठवत पण कथा ह्या एका गोष्टीचीच होऊ शकते. थोडीशी modern, खडूस, दिसायला smart पण नुसत्या रंगांच्या नाही तर ढंगाच्या जोरावर मनाला भिडणार व्यक्तिमत्व !! आमची मजल कधी बोलण्या पर्यंत गेलीच नाही आणि आम्ही इतके प्रसिद्ध नव्हतो कि स्वताहून कोणी बोलायला येइल. आमच्या ख्यातीच्या गप्पा इथे नकोच मुळी.
शमा आणि माझी गाठ parking मध्ये पडली.  तिच्या गाडीवर बसून ( ती तिथे नसतांना) आम्ही टिंगल टवाळी करत होतो. तिच्या अचानक तिथे येण्याने आम्ही शांत झालो आणि तिने आमच्यावर काहीतरी joke केला. आमच्यातले तेज जागृत व्हायला तेवढ पुरेस होत. मग ठरलं कि आता या कन्येला थोड seriously घ्यायचं. त्या नंतर तिच्या घराचा पत्ता, येण्याच्या-बाहेर पडण्याच्या वेळा, यांची तपशीलवार माहिती गोळा  करण्यात आली. तिचा पाठलाग करण्याचे  plan आखण्यात आलेत. अश्याच एका महत्वाच्या मोहिमेची तयारी करतांना माझे आणि माझ्या परम मित्राचे बोलणे माझ्या "आजीने" ऐकले. आजी म्हणजे- बहिण. पण असले विषय असले कि आणि माझ्यावर लक्ष ठेवणे हा मुद्दा असेल तर मी तिला आजी म्हणणे पसंत करतो.

आम्ही code words मधेच बोलत होतो. जहाज, सावज, पाठलाग, मोहीम, मुहूर्त वगैरे वगैरे. पण समवयस्क असल्यामुळे आणि माझी सगळी जवाबदारी तिच्यावर सोडून आई बाबा office ला जात असल्यामुळे तिला हे सगळ कळायला जास्त वेळ लागला नाही. पुन्हा घरात आल्यावर मी अगदी निष्पाप मनाने माझी कामं करायला लागलो. बराच वेळ मला धास्ती होती कि तो विषय निघेल पण तसे झाले नाही. संध्याकाळी मी terrace वर गेलो तेव्हा ती चोरपावलांनी मागे आली. आता हा विषय निघणार आणि सगळा अहवाल जेवणाआधीच आई-बाबांपर्यंत पोहोचणार. मला संध्याकाळी जेवण मिळणार नाही अस मला वाटलं. नंतर तो long term म्हणतात तसा विचार केला तर घरातून बाहेर घालवणारा आघात पण होवू शकतो. मी सरळ जावून ताईला सगळ सांगणार होतो पण थोडी कूटनीती ते काय असते ना करूया असा विचार आला.
 
"तू दुपारी मित्राशी काय बोलत होतास ?"
"काही नाही. असेच college चे विषय होते." 
"काय सावज?मोहिम?"
मी खिंडीत तर सापडलोच होतोच पण रस्ता अरूंद आणि निसरडा होत चालला होता.

ताईने आत्मविश्वासाने पुढला आरोप केला.
"पोरीचा विषय वाटतोय."
मी अजुनही पळवाटा शोधत होतो. मी काहि उत्तर देणार त्याआधीच दुसरा प्रश्नाचा वाग्बाण भात्यातून निघाला होता. शरपंजरीवर किती बाणांवर निद्रीस्त व्हायच हाच विकल्प माझ्यासमोर होता. माझ्या मनात असेच जडत्वाचे विचार येत होते.
तू काय केलेस माहित नाही. मी तुला याबद्दल दोष पण देणार नाही. या वयात अस वाटण स्वाभाविक आहे. पण हे प्रेम आहे की नुसत attraction ? की फक्त एखादी शर्यत किंवा अजुन काही. याला काही अंत आहे आहे का? एकदा मैत्री म्हणून जे छान नात असत तुही try कर. सगळीकडे फक्त एकच ध्येय नको.
पटवून पटवून किती पटवशिल?- १,२,३.....मैत्री मधे असे बंधन नाही. तुटण्याची भीती नाही. Impression मारायची गरज नाही. छान स्वच्छ निष्पाप मैत्री !!! 

हा असला विचार माझ्यासाठी नवा होता. पचायला पण कठीण होता. मी अवाक झालो होतो. 
काही दिवसांनी college चा एक समारंभात निवेदक म्हणून माझी निवड झाली आणि मुलींकडून शमा  होती. तिला तो पार्किंग मधला प्रसंग आठवला नाही पण माझ्या मनात त्या प्रसंगाच सावट अजूनही होत. कार्यक्रमाची तयारी नीट झाली, आमचं coordination  पण छान  होत. सगळ्यांनी त्याच कौतुक केल. मी जरा  सांभाळून बोलत होतो आणि मी वागण्यात कधीच तिला impress  करण्याचा प्रयत्न केला नाही. मग college  च्या गप्पा, छंद, घराच्या गोष्टी बरच काही share  केल.  त्यातलं सारख आणि वेगळ यावर चर्चा झाल्यात.  भेटी वाढल्या आणि जवळीक वाढली. सोबतचे सगळे चिडवायला लागले पण माझ्यावर त्याचा फरक पडला नाही. अशीच एक अफवा तिच्या कानावर आली आणि मग ती खूप चिडली. पण जेव्हा मी तिला पटवून दिले कि मी फक्त तुझ्याकडे मैत्रीण म्हणून बघतोय आणि बघणार मग तिला पटले. आमची मैत्री फुलली आणि दिवसागणिक बहरली. 
मग नंतर एकदा शमा मला भेटायला  घरी आली होती तेव्हा ताईने सहज विचारल प्रगती काय पूढे? मी तिला सांगितलं हो आहे ना ! आम्ही खूप चांगले मित्र  आहोत. ती माझी शुद्ध मैत्रीण आहे ! पहिली  मैत्रीण ! Thanks ताई. तु चार खडे बोल सुनावले म्हणून मी खूप वेगळा विचार केला. यानंतर कुठली पण छान मैत्री फुलली कि मी ताईला फोन करून सांगतो. त्यावेळी जर ताई मैत्रीण होवून वागली असती तर मला या विषयात मदत केली असती. पुढली story ने कुठले वळण घेतले असते माहित नाही. पण ताईने वेगळा पर्याय सुचवला. त्याने माझा द्रुष्टीकोन बदलला.

सगळेच बोधामृताचे धडे आयुष्य घडवण्यासाठी नसतात काही आयुष्य सुंदर बनवितात. आणि मैत्री शिवाय सुंदर गोष्ट नाही. मैत्री आयुष्यभर पुरते !!

(ताईने दिलेला "डोस" आणि एक शुद्ध मैत्री(ण ) हे खर आहे बाकी संदर्भ नावासहित जुळवले आहेत. शोध घेवू नका. आताच्या ढीगभर मैत्रिणींमध्ये मधून शोधता येणार नाही.)
 
अमित जहागिरदार
२७-०६-२०१५
मुंबई -पुणे प्रगती एक्सप्रेस्

ता क - माझ्या बायकोला हि गोष्ट अजून detail मध्ये माहित आहे म्हणून तिला काही विचारू नये !!
 

सामुहिक काडीमोड

सामुहिक काडीमोड

मस्त पाऊस पडतोय , डोंगर ढगांनी माखून गेलेत, नद्या नाले पाण्याने नाहून गेलेत आणि अश्या romantic वातावरणात मला हाच विषय सुचवा ?? कारण हेच तसं !  बर हा विषय सध्या दिसणाऱ्या घटस्फोटाच्या trends शी संबधित नाही.

मागल्या आठवड्यात नागपूरहून येतांना train मध्ये एक तरुण तरुणींचा मोठ्ठा group होत. साधारण ६०-६२ वयाचे असतील पण एकंदरीत उत्साहावरून असे वाटत होते की अगदी collegeची एखादी सहल असावी. ६ आजोबा आणि ७ आजी होत्या. आमच्या दोघांच्या seats त्यांनी काबिज केलेल्या दोन कुपेमधेच होत्या. एका आजोबांनी होणाऱ्या त्रासाबद्दल अगदी प्रवास चालू झाल्यावरच दिलगिरी व्यक्त केली.
"अहो आजोबा तसं काही नाही. तुम्ही enjoy करा आणि त्रास  कुठे होतोय !!"
आजोबा म्हणाले, " अरे आम्ही अजून दंगा चालू कुठे केलाय ??"
त्यांच्या असल्या बोलण्याने खर तर आम्हाला खूप काळजी वाटत होती. दिवसभराच्या दगदगीमुळे आता कधी झोपतोय असं झाल होत.
पुढल्या संभाषणातून कळल की हा group नागपूरच्या एका शाळेचा आहे.  १९७१-७२ ला दहावी पास झालेल्या मुला मुलींचे गेट-टुगेदर पुण्याला plan केल होत. नागपूर, मुंबई आणि अजून एक दोन शहरातून हि फौज उद्या पुण्याला पोहोचून २ दिवस मस्त धम्माल करणार. कुणी त्या वर्गाचे विद्यार्थी होते तर कुणी आपल्या जोडीदार बरोबर आले होते. आता आमची चांगली गट्टी जमली होती. वयाने म्हातारे असूनही कुठेही तब्येतीच्या तक्रारी आणि आमची-तुमची पिढी या विषयांना थारा नव्हता. पण जशी रात्र होत होती तसे विषय बदलत होते. आता मी आजोबांच्या group मध्ये आणि बायकोने आजींच्या group मध्ये गप्पांचा रतीब चालू केला होता. विषय बायको वर येवून ठेपला आणि सगळे आजोबा एक साथ पेटून उठले. जो तो बायको या विषयावर तोंड भरून बोलत होते.
जोशी काका खूप गप्प होते, ते आधी पण बोलले नाही आणि बायको या विषयावर पण नाही बोलले. सगळ्यांची निजानीज झाल्यावर मी आणि जोशी काकाचं जागे होतो. बिछाना टाकून झाल्यावर मी आणि काका बोलायला लागलो. मी मगाशी त्यांना observe करत होतो हे काकांना कळल होत. आता काका बोलायला लागले होते. बायको या विषयावर झालेला परिसंवाद काकांना आवडला नसावा असा कयास होता. अनोळखी व्यक्ती सोबत आपण काही खासगी आणि विशेष बोलायला मनावर दडपण येत नाही. काका बोलायला लागले.

" माझं लग्न २३ व्या वर्षी झाल, बायकोच वागण घरच्यांना पटायचं नाही म्हणून  मी दुसऱ्या गावात बदली करून घेतली. तरी पण तिच्या वागण्यात जास्त फरक पडला नाही. मुले झालीत संसार म्हणायला पुढे सरकत होता पण तिच्या वागण्यात जास्त फरक पडला नाही."
"- "
" थोडासा पण वाद झाला कि माहेरी जायचं आणि घरच्यांना काही पण कारण सांगायची. अगदी माझ बाहेर काही प्रेम प्रकरण आहे या पासून ते मी वेशिपार जातो ……
आधी मी जोमाने भांडायचो मग ती घरी यायला अजून उशीर करायची. दिवसांच्या गोष्टी आठवड्यामध्ये आणि मग महिन्यांमध्ये गेल्यात. मुल लहान असतांना सुद्धा हे प्रकार घडलेत. दुध पिण्याऱ्या बाळाचे हाल बघूनही कधी  तिच्या मनाला पाझर फुटला नाही."
" हे सगळ मी निमूट पणे सहन केल. माझ मन, माझे छंद, माझ आयुष्य, माझे ध्येय ह्या सगळ्या गोष्टी अस्तित्वात पण होत्या असे कधी वाटले नाही. दिवस न रात्र एक संघर्ष होता जो मी अनुभवत होतो. "

" काका हे खूप भयंकर आहे !! तुम्ही सहन … "

" सहन करण्याशिवाय काय पर्याय होता?? मुले असतांना कुठे जाणार ?? आई जरी आईच कर्तव्य पार पाडत नव्हती मी बाप म्हणून सगळ बघायला हव ना !! मी आई आणि बाप दोन्ही झालो पण माझ्या तला नवरा कधीच धारातीर्थी पडला होता. संसार फुलायायाची स्वप्न बघितली पण रात्रीला गंध देणारी ती फुले शृंगाराची नव्हती तर माझ्यातल्या प्रियकराच्या प्रेतावर टाकलेली होती."

"-"
" पण ती गेली तेव्हा मी सुटलो. आता जोडीदाराची गरजच नाही पण मन प्रसन्न ठेवायला खूप कारण आहेत. त्यामुळे मी बायको या विषयवार काहीच बोललो नाही."

मी सुन्न होईल ऐकले पण मला बऱ्याच वेळ झोप आली नाही. सकाळी पुण्याला उतरून घरी जातांना बायकोला हि गोष्ट सांगणार तर taxi मध्ये बसल्या बसल्या बायकोने खांद्यावर डोके ठेवले. मला वाटले थकली असेन प्रवासाने.
" काय झाले ? थकली का ??"
" तू खूप छान आहेस"
" बाप रे काय झाले ?? शोप्पिंग ला जायचं का ??
" नाही रे !! तू माझी खूप काळजी घेतो. "
" नीट सांग !! कौतुक करतांना पण दाखले दे , बाकीच्या वेळी देतेस तसे !!"
" गाडी मध्ये त्या हिरव्या साडीतल्या आज्जी आठवतात ?? त्यांनी तुला लोणचे आणि चटणीचा आग्रह केला होता ??"
" हो पण त्यांचा आणि माझ्या चांगल असण्याचा काय संबंध?? "

"त्या पटवर्धन आजी !! काका आले नाहीत कारण त्यांना अस गेट टुगेदर ला जाणे पटत नाही. आजींना गाण्याची वाचनाची खूप आवड ! त्यांच्या लहानपणी त्या गाण शिकल्या आणि शाळा -college मध्ये सगळ्या समारंभात गायच्या पण ! आजोबांनी लग्न झाल्याबरोबर आजींनी सोबत आणलेली पेटी दुसऱ्यादिवशी भंगार मध्ये विकली. गाणे बंद झाले , इतकेच नाही तर गुणगुणणे पण बंद झाले. स्वर रुसलेत शब्द पण हरवले. संसार पुढे ढकलायचा म्हणून काकूंनी सगळं सोडले. तरी पटवर्धन आजोबा बदलले नाहीत. मन जुळण्यासाठी इच्छा आकांक्षा आणि संवेदनांची आहुती देवूनही संसाराचा तो  दाह सहन करत आजी आज पर्यंत जगत आल्यात. पण खर जगल्या की श्वास घेवून दिवस काढले. आज सगळ्या जवाबदाऱ्यातून मुक्त होवूनही त्या नवरा या पाशात गुरफटतल्या आहेत. समाज काय म्हणेल हा विचार नसता तर गाण्याच्या साहित्याची बोली होण्याचा वेळेत मी निघून आली असती अस म्हणाल्या. मुले मोठी झाली कि त्यांची लग्ने झालीत कि अथवा संसार मार्गी लागली कि मग सोडून जावू. खर्जातला का होई ना पण एक सूर लावून बघू असा विचार केला. पण आता तेही शक्य नाही. सहवासात नि:प्राण वस्तूंमध्ये जीव जडतो. इथे तर एक माणूस आहे - जन्मभराच्या सोबतीचा !!"

खूप बोलल्या आजी !! त्याचं दु:ख बघून मला रात्रभर झोप नाही लागली . किती भयंकर आहे हे ??

मी पण सुन्न झालो !! मी बायकोला जोशी आजोबांची गोष्ट सांगितली. आज जेव्हा कुठल्या तरी शुल्लक कारणावरून घटस्फोटाच्या गोष्टी ऐकायला मिळतात आणि ही लोक आयुष्यभर नुसती सहन करतात. वाटत त्यांना अस वेगळ होण्याची गरज पण होती !!

आता वाटायला लागलाय कि असे किती जण असतील ज्यांना सोबत राहण म्हणजे मरणप्राय यातना असतील आणि फक्त लोक काय म्हणतील किंवा
 जवाबदाऱ्या या गाष्टींमुळे ते फक्त एका छताखाली राहत असतील !! फक्त मनातल एकदा ओठावर येण्याची ती काय वाट पहावी लागेल !! ती हिम्मत आणि आपल स्वतःच आयुष्य  जगण्याच्या अधिकाराची जाणीव.उगाच समाजाने टाकून दिलेल्या बेडी मध्ये आयुष्यभर अडकून बसायच. आणि दुर्भाग्य म्हणजे तो समाज नंतर सगळ सावरायला येतोही पण संसाराची नाही तर शरीराची राख!! 
जन्मभर नवरा आणि त्याच्या घरच्यांसाठी अविरत झडणारी स्री असो वा बायकोने कधी साथ दिली नाही म्हणून कुढणारा पुरूष असो. प्रश्न का सोडायच जोडीदाराला हा नाहीय. कारण नाही तर सोसल्याची भावना पराकोटीला गेली की आणि सोबत राहण म्हणजे फक्त एका छताखाली राहण झाल की विचार करावा. संवादच होत नसेल तर वाद न होणारा संसार हा आदर्श संसार होवू शकत नाही. वेगळ्या वाटा शोधायला काय हरकत आहे मग???

सामुहिक काडीमोड असा एक program करायला पाहिजे अश्या सर्वांसाठी!!
एखाद मैदान मिळेल का भाड्याने ??


अमित जहागीरदार
०२-०७-२०१५
पुणे